राज ठाकरेंनी अमित शहांना म्हटले नरकासूर, व्यंगचित्रातून साधला निशाणा

Foto

मुंबई - राज ठाकरेे यांच्या निशाण्यावर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले आहेत. खास दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांनी सुरु केलेल्या व्यंगचित्र मालिकेत मंगळवारी नरकचतुर्दशी निमित्त प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहांना नरकासुराच्या रुपात दाखविले आहे. या नरकासुराला चिरडण्याचे स्वप्न भाजप कार्यकर्त्याला पडत असल्याचे दाखवून सामान्य भाजप कार्यकर्त्याच्या मनातील सूप्त इच्छा राज यांनी व्यंगचित्रातून व्यक्त केली आहे.

 

नरकचतुर्दशीला नरकासुराचा वध

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सध्या कोणत्या मानसिकतेत आहेत, याचे समर्पक चित्रण राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून केले आहे. हिंदू संस्कृतीनुसार नरकासुराचे अत्याचार वाढल्यानंतर आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केला होता. तो दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. नरकासुराचे प्रतिक म्हणून आजच्या दिवशी कोहळा फळ पायाखाली चिरडले जाते.

 

राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात भाजप कार्यकर्त्याला स्वप्न पडत आहे की तो अमित शहांना पायाखाली चिरडत आहे. राज यांनी कोहळा फळाच्या रुपात अमित शहांना दाखविले आहे. त्यावर लिहिले आहे, भाजपाला पडलेलं दिवाळी पहाटचे स्वप्नं!’

 

रोज प्रसिद्ध होत असलेले ही व्यंगचित्रचे भाजपला झोंबणारी आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी सुरु केलेली ही व्यंगचित्र मालिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. यावर आता भाजप काय प्रतिक्रिया देते हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे. 


राज ठाकरेंनीव्यंगचित्रातून केली मुख्यमंत्री फडणवीसांची 'धुलाई'